कांदळवन कक्ष
महाराष्ट्र शासन
कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी
जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान

ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य

मुंबई आणि ठाण्यासारख्या कॉंक्रीटच्या जंगलामध्ये १७ चौ.किमी क्षेत्रावर ठाणे खाडी पसरली आहे. ही खाडी सुमारे २०० प्रजातीच्या पक्ष्यांचे माहेरघर आहे. ज्यामध्ये बऱ्याच स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजातींचा समावेश आहे. या स्थलांतरित पक्षी प्रजातींमध्ये 'रोहित' म्हणजेच फ्लेमिंगो हा पक्षी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. फ्लेमिंगो हा उंच, गुलाबी आणि खालच्या दिशेला वलयांकित चोच असलेला पक्षी आहे. त्याला लांब व मोहक पाय आणि मान, मोठे पंख आणि लहान शेपटी असते. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांमध्ये हजारोंच्या संख्येने स्थलांतर करुन 'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्या'त येणारे हे रोहीत पक्षी सर्वांनाच भावतात.

कांदळवन कक्षाने ठाणे खाडीच्या समृद्ध कांदळवन क्षेत्रातील पक्षी संवर्धनासाठी एक मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. भारत सरकार आणि 'फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी' यांच्यातील 'इंटरनॅशनल क्लायमेट इनिशिएटिव्ह' कराराच्या आधारे, सागरी जैवविविधता संवर्धनासाठी 'किनारी आणि सागरी संरक्षित क्षेत्राचे शाश्वत व्यवस्थापन' हा द्विपक्षीय प्रकल्प 'जीयआयझेड' नामक जर्मन एजन्सनीच्या मदतीने महाराष्ट्रात सुरू करण्यात आला. या प्रकल्पामुळेच 'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्या'ची अधिसूचना जाहीर झाली. सिंधुदुर्गमधील 'मालवण सागरी अभयारण्या'नंतर महाराष्ट्रातील हे दुसरे सागरी अभयारण्य आहे. याठिकाणी पक्षी निरीक्षण आणि पर्यटकांना खाडीत सैर करण्यासाठी 'फ्लेमिंगो नौका स्वारी' उपलब्ध आहे.

१५ ऑगस्ट २०२२ रोजी ठाणे खाडीला रामसार पाणथळ जागेचा दर्जा देण्यात आला. ठाणे खाडी सर्वात मोठ्या रामसार स्थळांपैकी एक आहे ज्याचा विस्तार ६,५०० हेक्टर असून त्यात इको सेंसेटीव्ह झोनचाही समावेश आहे. तसेच, हे महानगरामध्ये असलेले पहिले रामसार स्थळ आहे. हे महाराष्ट्रातील तिसरे तर भारतातील ७२ वे रामसार दर्जा प्राप्त पाणथळ आहे. 

केंद्राला भेट व बोट सफारीकरिता संपर्क: +91 99876 73737

अधिक माहितीसाठी ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य या संकेतस्थळाला भेट द्या.

ठाणे खाडी फेमिंगो अभयारण्याचा सुधारीत व्यवस्थापन आराखडा (वर्ष २०२०-२१ ते २०२९-३०)

ठाणे खाडी फ्लॅमिंगो अभयारण्यातील रोहित पक्षी
ठाणे खाडी फ्लॅमिंगो अभयारण्यातील रोहित पक्षी
 
फ्लेमिंगो बोटीतून दिसणारे सुंदर रोहित पक्षी
 ठाणे खाडी फ्लॅमिंगो अभयारण्य नौका स्वारी