कांदळवन कक्ष
महाराष्ट्र शासन
कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी
जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान

इतिहास आणि मूळ

कांदळवन कक्ष - महाराष्ट्र वन विभाग

महाराष्ट्राला सुमारे ७२० किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. ज्यामध्ये कांदळवने, प्रवाळ, खडकाळ - वालुकामय किनारे, दलदलीचे क्षेत्र इत्यादी विविध किनारी परिसंस्था आहेत. किनारी आणि सागरी परिसंस्था केवळ वनस्पती आणि जीवजंतूंच्या विस्मयकारक वैविध्याला आधारच देत नाही तर त्यासोबत मानवी जीवनासाठी आवश्यक असलेल्या असंख्य पर्यावरणीय सेवा पुरवते. ज्याद्वारे किनारपट्टीवरील रहिवास्शांना सुरक्षितेसोबतच उदरनिर्वाहाची साधनेही उपलब्ध होतात. या गोष्टी विचारात घेऊन, कांदळवनांच्या पर्यावरणीय परिसंस्थेचे संरक्षण आणि संवर्धन, किनारपट्टी व सागरी परिसंस्थेतील लोप पावणाऱ्या प्रजातींवरील संशोधन कार्यक्रम आणि शाश्वत उपजीविका उपक्रमांव्दारे किनारपट्टीलगत अधिवास करणाऱ्या लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वन विभागाअंतर्गत २०१२ मध्ये कांदळवन कक्षाची स्थापना केली आहे. कांदळवन कक्षाचे प्रमुख ‘अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक’ आहेत. याव्यतिरिक्त, राज्यातील कांदळवन संरक्षणाच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी उप वनसंरक्षक पदाची नियुक्ती करण्यात आली.

मुंबई महानगर प्रदेशातील विकासाचा वाढता दबाव, कचरा, प्रदूषण आणि अतिक्रमण लक्षात घेता कांदळवन कक्षांतर्गत 'मुंबई कांदळवन संधारण घटक' याची निर्मिती १७ मे २०१३ रोजी करण्यात आली. त्याचे प्रमुख विभागीय वन अधिकारी आहेत.

उच्च न्यायालयाने सरकारी जमिनींवरील कांदळवनांना ‘संरक्षित वनक्षेत्र’ आणि खाजगी जमिनींवरील कांदळवनांना ‘वने’ म्हणून घोषित करण्याचे निर्देष दिले आहेत.

कांदळवन कक्षाच्या स्थापनेने महाराष्ट्रात कांदळवनांच्या संवर्धनासाठी अनेक उपाययोजना सुरू झाल्या आहेत. कांदळवन कक्षाने किनारपट्टीलगत असलेल्या अवक्रमित क्षेत्रांवर कांदळवनांचे वृक्षारोपन करण्यासाठी मोठ्या संख्येने रोपवाटिका तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच विविध जागरूकता कार्यक्रमाअंतर्गत ‘कांदळवन स्वच्छता मोहिमा’ राबविण्यात येत आहेत.

कांदळ (रायझोफोरा म्यूक्रोनाटा)
कांदळवन कक्षाच्या अधिकाऱ्यांची क्षेत्र भेट