कांदळवन कक्ष
महाराष्ट्र शासन
कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी
जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान

प्रतिष्ठानाविषयी

महाराष्ट्र कांदळवन 

आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान

(कांदळवन प्रतिष्ठान)

'पर्यावरण पूरक संकल्पना आणि संवर्धनाचा दुवा साधून किनारी व सागरी जैवविविधतेचे संवर्धन आणि किनारपट्टीलगतच्या समुदायांच्या उपजीविकेच्या साधनांमध्ये सुधारणा आणण्याच्या दिशेने कार्यरत’'

'महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान' (कांदळवन प्रतिष्ठान) ही महाराष्ट्र शासनाच्या 'महसूल आणि वन विभागा 'अंतर्गत स्थापन झालेली स्वायत्त संस्था 'सोसायटी नोंदणी कायदा, १८६०' अंतर्गत नोंदणीकृत आहे. राज्याच्या किनारपट्टी क्षेत्रात महत्त्वपूर्ण संवर्धन कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी विषय-तज्ज्ञांची नेमणूक करण्यासाठी आणि विविध उपक्रमांच्या कामकाजामध्ये लवचिकता आणण्यासाठी या प्रतिष्ठानाची निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने २३ सप्टेंबर, २०१५ रोजी शासन निर्णय क्रमांक एस-३०/२०१५/प्र.क्र. २१९/फ-३ च्या अन्वये याची स्थापना केली. या प्रतिष्ठानासाठी ११५ कोटी रुपयांचा कॉर्पस निधी देण्यात आला त्याद्वारे किनारी आणि सागरी जैवविविधतेचे संरक्षण, संशोधन आणि शाश्वत उपजीविका निर्माण करण्यासाठी 'कांदळवन प्रतिष्ठान' सक्षम झाले आहे.

किनारी जैवविविधतेबरोबरच कांदळवनांचे संवर्धन आणि देखरेखीचेही कार्य 'कांदळवन प्रतिष्ठान' करते. राज्य सरकारच्या 'कांदळवन संवर्धन आणि उपजीविका निर्माण योजने'ची अंमलबजावणी करण्यासाठी ‘कांदळवन प्रतिष्ठान’ काम करते. याव्यतिरिक्त विविध भागधारकांसाठी क्षमता बांधणी कार्यक्रमांचे आयोजन प्रतिष्ठानाकडून करण्यात येते.

श्री. एकनाथ शिंदे, मा. मुख्यमंत्री - कांदळवन प्रतिष्ठानचे आश्रयदाता
श्री. सुधीर मुनगंटीवार , मा. वनमंत्री - कांदळवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष

माननिय मुख्यमंत्री या प्रतिष्ठानाचे आश्रयदाता असून माननिय वन मंत्री याचे अध्यक्ष आहेत. याचे कार्यकारी संचालक वनविभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष हे असतील आणि सहसंचालक हे वन विभागाचे उपवन संरक्षक, कांदळवन कक्ष असतील. प्रतिष्ठानाच्या कार्यातील कार्यक्षमता वाढविण्याकरीता धोरणात्मक मार्गदर्शन आणि दिशा देण्याचे काम नियामक मंडळ आणि कार्यकारी समितीमार्फत करण्यात येते.

उद्दिष्टे

खालील उद्दिष्टे पार पाडण्यासाठी ना नफा-ना तोटा या तत्वावर 'कांदळवन प्रतिष्ठान' स्थापित करण्यात आले आहे

 • महाराष्ट्रातील कांदळवने व सागरी परिस्थितीकी आणि त्यामधील जैवविविधतेचे जतन करणे. यामध्ये त्यांचे संरक्षण, देखभाल, जीर्णोद्धार, पुनर्भरण, प्रजनन आणि शाश्वत वापर या उपक्रमांचा समावेश आहे. किनारपट्टीचे क्षेत्र, सागरी क्षेत्र, प्रवाळ खडक, कांदळवने, समुद्रकिनारे, वालूकामय आणि चिखलाचा प्रदेश इ. मधील वन्यजीवन आणि भूप्रदेशाचे वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन करणे.
 • क्षमता बांधणी कार्यक्रम आणि जनजागृतीच्या माध्यमातून स्थानिक समुदायांमध्ये विशेषत: महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्या समुदायामध्ये शाश्वत उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रोत्साहन देणे.
 • राज्यातील किनारपट्टीलगतीची गावे, बेटे आणि सागरी भागांमध्ये शाश्वत नैसर्गिक संसाधनांवर आधारित आर्थिक उपक्रमांना चालना देणे.
 • निसर्ग पर्यटनाला चालना देण्याबरोबरच निसर्ग शिक्षणाकरिता आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि किनारपट्टी, बेटे, सागरी भागात भेट देणाऱ्या अभ्यागतांच्या आनंदाची काळजी घेणे.
 • केंद्र आणि राज्य सरकारसह प्रमुख भागधारक, शैक्षणिक संस्था, नामांकित अशासकीय संस्थांच्या सक्रीय सहभागाने राज्यातील किनारपट्टी, बेट आणि सागरी भागात कांदळवन व सागरी जैवविविधतेचे संवर्धन, जीर्णोद्धार आणि संरक्षणासाठी पर्यावरणीय संशोधनास चालना देणे.
 • कांदळवन आणि सागरी जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धनास हातभार लावण्यासाठी निसर्ग शिक्षणास प्रोत्साहन देणे.
 • राज्यातील कांदळवन आणि सागरी जैवविविधतेचे संरक्षण, संवर्धन, विकास आणि सद्उपयोगाकरिता नागरी संस्था, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, देणगीदार संस्था, नामांकित कंपन्या, नगरपालिकेबरोबरच संशोधक, स्वयंसेवक आणि इतर व्यक्तींकडून संसाधनांचे एकत्रीकरण करणे.
 • तज्ज्ञ, व्यावसायिक, सल्लागार, सार्वजनिक संस्था, विद्यापीठे, संघटना आणि कांदळवन व सागरी जैवविविधतेशी संबंधित संशोधन, संरक्षण, जीर्णोद्धार आणि पुनर्भरणासाठी काम करणाऱ्या संस्थांशी समन्वय साधणे.
 • कांदळवन आणि सागरी जैवविविधतेशी संबंधित माहितीचे संकलन, संग्रहण आणि त्या माहितीचा सुलभ प्रसार करणे. तसेच प्रतिष्ठानाच्या उद्दिष्टांशी संबंधित असलेल्या माहितीचा देखील प्रचार करणे.
 • राज्यात कांदळवन आणि सागरी जैवविविधतेच्या संदर्भात तयार होणारे धोरण आणि योजना, तसेच मच्छीमारांसह स्थानिक समुदायांच्या शाश्वत उपजीविकेसंबंधित विकासाकरिता माहिती आणि सूचना देणे.
 • किनारी आणि सागरी जैवविविधतेच्या संवर्धनासाठी सिंधुदुर्ग किनारपट्टीवर राबवलेला ‘जिओआय-यूएनडीपी-जिईएफ’ प्रकल्प, ‘जीयआयझेड’ प्रकल्प आणि कांदळवन कक्षाने राबवलेल्या तत्सम प्रकल्पांच्या अंमलबजावणीस पाठिंबा देणे. या प्रकल्पांचा विहीत कालावधी संपल्यानंतर त्यामधील उपक्रमांची दीर्घकाळ कार्यशीलता सुनिश्चिती करणे. यशस्वी झालेल्या कार्यक्रमांचा आणि पद्धतींचा अवलंब इतर प्रकल्पांमध्ये करणे.
 • प्रतिष्ठानाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आवश्यक, प्रासंगिक आणि हितकारक असलेल्या सर्व गोष्टी करणे.

कांदळवन प्रतिष्ठानच्या एकात्मिक अहवाल (आर्थिक वर्ष २०१५-२०२०) (Download PDF)

कांदळवन प्रतिष्ठानाच्या वार्षिक अहवालाचे (२०२०-२१) प्रकाशन मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ६ सप्टेंबर २०२१ रोजी झाले (Download PDF)

कांदळवन प्रतिष्ठानाच्या वार्षिक अहवालाचे (२०२१-२२) प्रकाशन 14 सप्टेंबर २०२२ रोजी  झाले (Download PDF)

 

 

मच्छीमारांसाठी जागरूकता कार्यक्रम
कांदळवन प्रतिष्ठानामार्फत राबवले जाणारे कांदळवन स्वछता कार्यक्रम 
कांदळवन सहल
पिंजरा पालन प्रकल्पातील मिल्क फिश उत्पादन 
कोकण महोत्सवातील कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानाच्या प्रदर्शिका 
ब्ल्यूकॉन इव्हेंटमधील कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानाच्या प्रदर्शिका 

कांदळवन प्रतिष्ठानाचे उपक्रम

संस्थात्मक मांडणी